Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा!

August 01, 2017

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा!

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

मो. क्र. ९८२२०१०३४९

पुनवेचा चंद्र उगवलेलाअसतो, हृदयी प्रीतीचा दर्या उसळलेला असतो, दाही दिशा खुललेल्या अन् वनीवनीकुमुदिनी फुललेल्या असतात, नववधू मनी अधीर झालेली असते आणि स्वर्गीय प्रणयरसचहूकडे वितळलेला असतो... आणि अशाच वेळी प्रश्न पडतो, आता गर्भ निरोधक कुठलं वापरावंबरं?

कसं धाडकन जमिनीवरआदळल्यासारखं वाटलं ना? पण ह्या प्रश्नाचं उत्तर जे वेळीच शोधत नाहीत तेही असेचआदळतात.

लग्न ठरल्यावर बाकीसगळ्याचा विचार होतो. देणंघेणं, मानपान, हुंडाबिंडा, वऱ्हाडी-वाजंत्री,बिऱ्हाड-बाजलं, पोषाख-बिषाख, इव्हेंट मॅनेजर... काही विचारायची सोय नाही. फक्त एकागोष्टीबद्दल सारे चिडीचूप असतात. सुरवातीला गर्भ निरोधक कोणतं वापरावं? एखादी,एरवी आगाऊ किंवा ढॅण-ढॅण समजली गेलेली आत्या, विषय काढते पण कोणीच तिकडे लक्ष देतनाही. या बाबतीत सल्ला घ्यायला आधीच डॉक्टरकडे जाण्याची फारशी पद्धत नाही. बऱ्याच लोकांनाअसं वाटतं की डॉक्टर लाजतील वगैरे. तसं काही नसतं. डॉक्टरी सल्ला घेणं महत्वाचंआहे. तो जरूर घ्यावा.

नवविवाहित जोडप्यांसाठीसर्वात बेस्ट गर्भनिरोधक म्हणजे गोळ्या! लो डोस कंम्बाइन्ड ओरल कॉंट्रासेप्टीव्हपिल्स.

इतर पद्धतींचे तोटे जास्तआणि फायदे कमी अशी परिस्थिती आहे.

लग्नात व्रात्यमित्रांकडून, सप्रेम भेट म्हणून, हमखास दिलं जाणारं ‘निरोध’, ऐनवेळी वापरावं लागतं.बऱ्याच जणांना असं ऐन मोक्याच्या वेळी टाईम प्लीज म्हणणं जमत नाही. मग घोटाळेहोतात. (अपयशाचं प्रमाण १५%). हनिमूनचे दिवस म्हणजे नकळत सारे घडण्याचे दिवस.अशावेळी सदासर्वदा खिशापाकिटात निरोध बाळगून रहाणारा दक्ष पुरुष विरळाच. निरोधचावापर हे ही एक कौशल्य आहे आणि हे आत्मसात करायला थोडा प्रयत्न लागतो. गुडघ्यालाबाशिंग बांधलेल्या उताविळांना हे कसं साधणार? पहिल्याच प्रयत्नात सगळं जमेल असंनाही. पहिल्याच प्रयत्नात संभोग जमेल असंही नाही; पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी. शिवाय ह्याच्या वापरामध्ये स्पर्श, तापमानइ. संवेदना कमी होतात. नव्या नवलाईच्या क्षणी हे कसं बरं मान्य होणार? काहीमहाभागांनी तर निरोधसह समागम म्हणजे कागदसकट चॉकलेट खाण्यासारखं आहे, असा खट्याळशेरा मारून ठेवला आहे. हे वापरताना नैसर्गिक वंगण उपलब्ध होत नाही, त्यामुळे काहीतरीपदार्थ वंगण म्हणून वापरावा लागतो. अगदी निरोध ‘चीकनाईयुक्त’ असला तरीही. हापदार्थ तैलयुक्त असून चालत नाही. त्यासाठी काही खास क्रीम्स उपलब्ध आहेत. पण हे माहित नसतं. मग बेडरूम मध्ये हमखास उपलब्धअसलेला पदार्थ, म्हणजे कोल्ड क्रीम, वापरलं जातं. पण कोणताही तैलयुक्त पदार्थ हा निरोधलाहानी पोहोचवतो. निरोधमधल्या लॅटेक्सला या तैलयुक्त पदार्थानी बारीक छिद्र पडतात.परिणामी काय होऊ शकत हे आपण जाणताच. आणखीही एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निरोध हेपुरुषांच्या ताब्यात असलेलं गर्भ निरोधक आहे. एखाद्यानी हे असलं काही नको असं ठरवलं,की बायका त्याबद्दल विशेष काही करू शकत नाहीत. ही श्रींची इच्छा म्हटल्यावर सौत्यात काही बोलू शकत नाहीत.

नवविवाहीतांमध्ये कॉपर टी(तांबी) हाही पर्याय सुलभ नाही. ती सहजपणेबसवण्यासाठी योनीमार्ग रुंद असावा लागतो, गर्भ पिशवीचे तोंडही किंचित उघडे असावेलागते. सुरवातीला असं नसतं. लग्नाआधीच काही कॉपर टी बसवता येत नाही. त्यामुळेमधुचंद्राच्या रात्री आणि नंतरही बऱ्याच काळ ही पद्धत बाद आहे.

निव्वळ प्रोजेस्टेरॉनहा घटक असलेल्या काही गोळ्या, इंजेक्शने,शरीरात त्वचेखाली बसवायच्या काड्या, योनीमार्गात ठेवायच्या रिंग असेही विविधप्रकार आहेत. परिणामकारक आहेत. (अपयशाचं प्रमाण ०.३%) पण या साऱ्यांनी पाळीअनियमित येते. अशी अनियमित पाळी ही त्या स्त्रीला आणि तिच्या सासर-माहेरला बहुधाअमान्य असते. ‘मुलीला नीट पाळी येतच नव्हती, हे लपवून ठेवण्यात आलं’, असाहीअनाठायी आरोप होऊ शकतो. सबब याही पद्धती एकगठ्ठा नापास ठरतात.

गर्भ निरोधनाच्या‘नैसर्गिक’ पद्धती या रकान्यात काही पद्धती आहेत. ‘गर्भ निरोधनाची नैसर्गिक पद्धत’हा वदतोव्याघात आहे. मुळात गर्भधारणा ‘नैसर्गिक’ आहे आणि गर्भनिरोधन अनैसर्गिक! तेअसो. पण मुलं ही देवाघरची फुलं असून जेवढी आपल्या पदरी पडतील तेवढी स्वीकारायचीअसं प्रेषितांनी सांगितल्याचं काहींचं म्हणणं असतं. अशी धर्मभोळी मंडळी मग कोणतंही,मानवनिर्मित गर्भनिरोधक वापरणं धर्मद्रोह समजतात. मानवकल्पित गर्भ निरोधन, म्हणजे‘नैसर्गिक पद्धती’ मात्र चालतात म्हणे!

भारताच्या राष्ट्रपित्यालाप्रिय अशी ब्रम्हचर्य ही यातील अग्रणी आणि अर्थात आत्ताच्या संदर्भात अप्रस्तुत.

योनीबाहेर स्खलन होईल अशीकाळजी घेणे, हा यातला एक प्रकार. यात दिवस रहाण्याची शक्यता तब्बल २०% असते. कामतृप्तीन झाल्याने यात पुरेपूर कामानंद मिळत नाही हा ही तोटा आहे.

स्त्रीबीज महिन्यात एकदाचतयार होते आणि त्यासुमारास संबंध आल्यास दिवस रहातात, अन्यथा नाही. ही बाब लक्षातघेऊन महिन्यातले ‘ते’ दिवस वगळून अन्य दिवशी समागम करणे अशीही एक चाल प्रचलित आहे.पाळी अतिशय नियमित असेल तर निव्वळ तारखेवरून अंदाज बांधता येतो. योनीस्त्रावतपासणे, शरीराचे तापमान पहाणे, अशाही पद्धती आहेत. यात अनेक खाचाखोचा आहेत. यातही कामक्रीडेतील उत्स्फूर्तता निघून जातेआणि वेळापत्रकानुसार ‘कामगिरी’ उरकावी लागते. यातही अपयशाचं प्रमाण २०% आहे. एकूणचनैसर्गिक गर्भनिरोधन हे बेभरवशाचं, अवसानघातकी आणि ‘अनैसर्गिक’ आहे. यासाठी उभयपक्षीउच्च कोटीचा संयम आणि पराकोटीचा निश्चय लागतो. थोडक्यात जनसामन्यांसाठी या पद्धतीकुचकामी आहेत.

रहाता राहिल्या गोळ्या. याआधीच घेता येतात, नव्हे आधीच घ्यायच्या असतात. संभोगाच्या वेळी मधेच टाईम प्लीज अशीभानगड नाही. अत्यंत खात्रीशीर आहेत. अपयशाचं प्रमाण निव्वळ ०.१%! अत्यंत सुरक्षितआहेत. एकदा गोळ्या घेतल्या, की या पापाची शिक्षा म्हणून, आपल्याला नंतर मूल होणारनाही अशी अनेकांची समजूत असते. घरातल्या मोठ्यांचा गोळ्यांना विरोध हा मुख्यत्वेया कारणानी असतो. गोळ्यांनी असं दूरगामी वंध्यत्व वगैरे काही येत नाही. गोळ्यांचापरिणाम तात्कालीक असतो. म्हणून तर त्या रोज आणि महिनोंमहीने घ्याव्या लागतात. उलटपी.सी.ओ.डी. सारख्या आजारात गोळ्या घेतल्यानी नंतर संतती संभव वाढतो!

‘आधी दोन वर्ष गोळ्याघेतल्या आणि आता रहात नाहीये!’... अशा छापाच्या कमेंट्स अज्ञानातून उगम पावतात. दिवसरहाणारच आहेत या गृहितकाआधारे गोळ्या सुरु केलेल्या असतात. दिवस रहाण्याची क्षमतात्या जोडप्यानी मुळी सिद्धच केलेली नसते. दिवस न रहाण्यामागे गोळ्या हे कारण कधीचनसतं. दुसऱ्या काही कारणानी दिवस रहात नसतात, त्याचं खापर मात्र गोळ्यांवर फोडलंजातं.

गोळ्यांचा आणखी एक गुणधर्मखूप खूप महत्वाचा आहे. गोळ्यांचा परिणाम हा ताबडतोब सुरु होत नाही. गोळ्या महिनाभरनियमित घेतल्याचा एकत्रित परिणाम म्हणून दिवस जात नाहीत. आजची गोळी आजच्यादिवसापुरती असं नाहीये. तेंव्हा पहिल्या महिन्यात गोळ्या आणि शिवाय आणखी काही गर्भनिरोधकवापरावे लागते किंवा पहिल्या महिन्यात संभोग टाळावा लागतो. नव्यानीच लग्न झालेल्याजोडप्याला संभोग टाळणं तर शक्य नाही. त्यामुळे केवळ गोळ्यांवर विसंबून रहायचं तरलग्नाआधी/मधुचंद्राआधी किमान महिनाभर या गोळ्या घेणं आवश्यक आहे. तेंव्हा कुठेइष्ट वेळी त्यांचा इष्ट परिणाम होईल. पण यासाठी आधी नियोजन हवं. मूल नको हा निर्णयत्या जोडप्यांनी घेतलेला हवा. त्यासाठी गोळ्या वापरायच्या हाही निर्णय झालेला हवा.यासाठी भावी पती-पत्नीमधे संवाद आणि चर्चा हवी. ह्या प्रश्नाची चर्चा करण्याइतकामोकळेपणा हवा. ‘डार्लिंग, आपल्याला बेबी कधी हवं?’ असं विचारल्यावर नुसतंच लाजायचीसवय आता मुलींनी सोडून द्यायला हवी. होणाऱ्या नवऱ्यानी हा प्रश्न केला नाही तरस्वतः हा प्रश्न विचारायला हवा... आणि मुलींकडून असा बोल्ड प्रश्न आला तर मुलांनीही डायरेक्टबेशुद्ध पडायची सवय सोडून द्यायला हवी.

थोडक्यात नववधू मनी अधीरझालेली असताना आणि स्वर्गीय प्रणयरस चहूकडे वितळलेला असताना, ‘आता गर्भ निरोधककुठलं वापरावं बरं?’ हा प्रश्न पडताच कामानये. ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच बोहल्यावर चढायचंय.

पद्धत

अपयशाचं प्रमाण

(पद्धत वापरूनही पहिल्याच वर्षात किती जोडप्यांना दिवस रहातात?)

निरोध

१५%

नैसर्गिक पद्धती

२०%

निव्वळ प्रोजेस्टेरॉन युक्त औषधे

०.३%

कॉपर टी

०.८%

लो डोस कंम्बाइन्ड ओरल कॉंट्रासेप्टीव्ह पिल्स (गोळ्या)

०.१%

(अनियमित वापरल्यास ५%)

कोणतीही पद्धत न वापरल्यास

८५%

प्रथम प्रसिद्धी, दिव्यमराठी, मधुरिमा पुरवणी, १/८/१७

या आणि अशाच लिखाणासाठीमाझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 951 hits